Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; खूनप्रकरणातील फरार संशयित अटकेत, अवैध शस्त्रसाठा जप्त

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; खूनप्रकरणातील फरार संशयित अटकेत, अवैध शस्त्रसाठा जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी केलेल्या ठोस कारवाईत खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार संशयितासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर.आर. शाळेजवळ सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संशयितांना अडवले. चौकशीत त्यांची ओळख धीरज उर्फ धनंजय दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) आणि अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) अशी पटली. तपासात धीरज कोळी हा खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

संशयितांची झडती घेतली असता पोलिसांना सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. यामध्ये दोन गावठी कट्टे, आठ तलवारी तसेच एक दुचाकीचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रसाठ्याचा वापर आगामी गुन्ह्यांसाठी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाल देशमुख व त्यांच्या पथकाने पार पाडली.

नशिराबादमध्येही कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित अटकेत

दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक करण्यात आली. चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून एक अस्सल गावठी कट्टा व एक बनावट कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या