भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील खंडाळा येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची गंभीर घटना घडली असून संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिंदी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी सौ. ज्योती शिंपी या दि. २५ मार्च रोजी खंडाळा गावात वीज बिल वसुलीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी गावातील ग्राहक काशिनाथ बाबुसेठ यांना प्रलंबित वीज बिलाबाबत विचारणा केली असता, संबंधिताने सर्वांसमोर त्यांना शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती त्यांनी तत्काळ सहकारी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सध्या मार्च अखेरचा कालावधी असल्याने महावितरणचे महिला व पुरुष कर्मचारी वसुलीसाठी नागरिकांकडे जात असून, काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, सौ. ज्योती शिंपी यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कॉन्स्टेबल विसपुते व तडवी हे करत आहेत.तक्रार दाखल करताना भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता श्री. महाजन, शिंदी शाखेचे अभियंता श्री. आखरे यांच्यासह सहकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांची भेट घेऊन केली आहे.

