पात्र कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा; शिक्षण उपसंचालकांना तातडीच्या सूचना
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे कोरोना कालावधीपासून प्रलंबित असलेले थकित व न्यायालयीन देयकांचा प्रश्न गंभीर बनला असून, या संदर्भात पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री Gulabrao Patil यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.या भेटीत कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती मांडताना, थकित देयके वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडून नाकारली जाणे, प्रत्येक वेळी नव्याने कागदपत्रांची मागणी होणे, तसेच शालार्थ प्रणालीमध्ये थकित देयके सादर करण्यासाठी आवश्यक टॅब वेळेवर उपलब्ध न होणे आदी अडचणींमुळे पात्र कर्मचारी त्यांच्या हक्काच्या आर्थिक लाभापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत वैयक्तिक लक्ष घालण्याची मागणीही करण्यात आली.
यावर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ दखल घेत शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पात्र कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.या वेळी अजित चौधरी, विक्रमादित्य (जीवन) पाटील, कैलास माळी, महेश आहेरराव, रविंद्र चौधरी, गणेश लोडते, विनोद मोरे आदी उपस्थित होते.

