नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील संतोष कैलास कोळी या जिद्दी तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत त्यांनी एसबीसी गटातून प्रथम क्रमांक मिळवत वर्दीचे स्वप्न साकार केले आहे.संतोष कोळी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे झाले. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. आई-वडील एमआयडीसीमध्ये मजुरी करत असताना त्यांचा सांभाळ मामांनी केला. शिक्षण घेत असतानाच त्यांनी घराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला; मात्र अभ्यासावर परिणाम होत असल्याने त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.
बारावीनंतर करिअरचा प्रश्न निर्माण झाला असतानाच लॉकडाऊनमुळे परिस्थिती अधिक कठीण झाली. २०२१ साली धनराज कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. प्रारंभी अपयश आले, २०२३ ची भरतीही हुकली. तरीही न डगमगता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.कल्पेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. गावात मिळालेल्या मोफत टेस्ट आणि धावण्याच्या सरावामुळे त्यांना मोठी मदत झाली. २०२४ मध्ये केवळ ५ गुणांनी अपयश आले, तरीही त्यांनी हार मानली नाही.दरम्यान, घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी भारत गॅस येथे नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला. सकाळी अभ्यास आणि रात्री काम असा कठोर दिनक्रम त्यांनी पाळला. याच काळात एमएसएफमध्ये निवड होऊन त्यांनी ४५ दिवसांचे प्रशिक्षणही पूर्ण केले.अखेरच्या प्रयत्नात त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल सराव करत मैदानी चाचणीत ४३ गुण, तर लेखी परीक्षेत तब्बल ८९ गुण मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी एसबीसी गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
संतोष कोळी यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असून मित्रांचे सहकार्यही मोलाचे ठरले. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक तरुणांना नवी दिशा मिळणार आहे.

