नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात काल उशिरा रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वीज व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.खंडेराव मंदिर परिसर तसेच सिद्धार्थ नगर भागात शहराला वीजपुरवठा करणारे ११ केव्ही क्षमतेचे दोन वीजखांब वाकल्याची घटना घडली.

परिणामी काही ठिकाणी वीजतारा तुटून पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वीजखांब उभे करण्यासाठी आणि तुटलेली लाईन दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सहकार्य व संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

