ICAR निधी गैरवापर, अनियमिततेचे आरोप; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
नवी दिल्ली | वृत्तसेवा | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार व गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत उपस्थित करत केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्र्यांचे लक्ष वेधले. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) कडून मिळणाऱ्या सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच केंद्रातील जुनी झाडे अनधिकृतपणे तोडणे, ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर करणे अशा गंभीर अनियमितता उघड झाल्याचेही त्यांनी नमूद केले.“कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. मी स्वतः केंद्राचा दौरा केला असता अनेक त्रुटी व गैरप्रकार समोर आले,” असे खासदार वाघ यांनी संसदेत सांगितले.

या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही मांडण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्देशानुसार कार्यरत राहतील, याची खात्री करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मुद्द्यावर कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संबंधित केंद्राविषयी नाराजी व्यक्त होत असल्याचे समोर आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करून शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.

