Sunday, July 26, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणआज पासून खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी नशिराबादमध्ये उत्साहाचे वातावरण; नशिराबाद यात्रेत बारागाड्या ओढण्याचा...

आज पासून खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी नशिराबादमध्ये उत्साहाचे वातावरण; नशिराबाद यात्रेत बारागाड्या ओढण्याचा सोहळा ठरणार आकर्षण

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे गेल्या दोन शतकांपासून अखंड परंपरा जपणाऱ्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास आज शुक्रवार, दि. ३ एप्रिलपासून प्रारंभ होत असून चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा हा यात्रोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.सुनसगाव रस्त्यावर असलेल्या खंडेराव महाराजांच्या पुरातन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

शुक्रवार (दि. ०३/०४/२०२६) रोजी सकाळी महाअभिषेक व पूजनानंतर दुपारी ४ वाजता कठडे मिरवणूक निघणार असून सायंकाळी ५ वाजता भगत युवराज धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा सोहळा पार पडणार आहे. रात्री ९ वाजता प्रिया बाई रावेरकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.शनिवार (दि. ०४/०४/२०२६) रोजी सकाळी पंचामृत अभिषेक पूजन होईल. रात्री ९ वाजल्यापासून शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी, चंदनपुरी यांचा कार्यक्रम रंगणार आहे. रविवार (दि. ०५/०४/२०२६) रोजी सकाळी पूजा होऊन रात्री ९ वाजता भीमा भाऊ, रवी भाऊ व सहकारी मंडळ यांचा लोकनाट्य कार्यक्रम सादर होणार आहे.गेल्या २०० वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान असून ही परंपरा पिढ्यान् पिढ्या जपली जात आहे. (कै.) रघू धोबी, शंकर रघू धोबी, गणपत शंकर धोबी व दामू शंकर धोबी यांनी सलग ३५ वर्षे ही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर मोतीलाल संपत धोबी यांनी १२ वर्षे, तर माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ऊर्फ सुदाम धोबी यांनी ५ वर्षे बारागाड्या ओढल्या. सध्या ही धुरा युवराज मोतीलाल धोबी यांनी मागील तीन वर्षांपासून सांभाळली आहे.

यात्रोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत भोळे, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार ज्ञानदेव लोखंडे यांच्यासह लालचंद पाटील, योगेश पाटील, पंकज महाजन, प्रकाश बोंडे, किरण पाटील, मुकुंदा रोटे, विकास धनगर, विकास पाटील, चेतन बऱ्हाटे, बापू बोढरे, गणेश चव्हाण, विनोद रंधे, मनोज पाटील, कैलास व्यवहारे, किर्तीकांत चौबे आदींसह गावातील विविध मंडळे, नशिराबाद नगरपालिका व पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.

हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी नशिराबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या