जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाजवळील श्री स्वामी ट्रॅव्हल्स कार्यालयासमोरून कुरिअरमधील मोबाईलचा बॉक्स चोरी झाल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी वेगाने तपास करत अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे ९६ हजार ९९६ रुपये किंमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी चौक परिसरातून विविध कंपनींचे पाच मोबाईल असलेला कुरिअर बॉक्स चोरीस गेला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करताना जिल्हापेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एका विधी संघर्षित बालकाचा शोध लावला. संबंधित बालकास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरी केलेले चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले.जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये व्हिवो व ओप्पो कंपनीचे विविध मॉडेल्स असून त्यांची एकूण किंमत ९६ हजार ९९६ रुपये इतकी आहे. उर्वरित मोबाईलचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रविण जाधव, प्रशांत लाड व चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.

