नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मधुकर चौबे होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, राजेंद्र पाटील, डॉ. संदीप महाजन तसेच मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमात वर्षभरात आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.त्यानंतर क्रीडा महोत्सवातील १०० व २०० मीटर धावणे, बादलीत बॉल टाकणे, बॉटल गेम तसेच लंगडी पळती या सांघिक खेळांतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांतील फॅन्सी ड्रेस व समूह नृत्य स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व शालेय साहित्य देण्यात आले.
कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले, तर अध्यक्षीय भाषणात मधुकर चौबे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी सूर्यवंशी व दिव्या सावळे यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन मंगला पिंगळे यांनी केले.

