नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – नशिराबाद नगरपरिषद हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील वाढत्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, याबाबत नगराध्यक्ष श्री. योगेश नारायण पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, जळगाव यांना सविस्तर पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.नगरपरिषदेकडे नागरिकांकडून वारंवार तोंडी तसेच लेखी निवेदने प्राप्त होत असल्याचे नमूद करत, महामार्गावरील विविध ठिकाणी अपघातांचा धोका वाढत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. विशेषतः नशिराबाद शहरात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील काझी पेट्रोलपंप परिसरात नशिराबाद गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी अंडरपास उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील तरसोद उड्डाणपूल ते नशिराबाद टोल प्लाझा दरम्यान योग्य रोड लाईटिंग व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर चौफुली येथे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्पीड ब्रेकर व हायमास्ट दिवे बसवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.यासोबतच महामार्गावरील दुभाजकांमध्ये योग्य ती सुरक्षा व्यवस्था करणे, व राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्तफा परार्यवरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे, तसेच प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक ठिकाणी निवारा शेड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नशिराबाद गावाजवळील चौबे पेट्रोल पंप परिसर व इतर भागांमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याबाबतही सूचनांचा समावेश आहे.
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती नगराध्यक्षांनी केली आहे. या पत्राची प्रती केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आल्या आहेत.

