Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादन्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात भक्तिरसात रंगली आषाढी दिंडी; वारकरी संस्कृतीसोबत स्वच्छता...

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात भक्तिरसात रंगली आषाढी दिंडी; वारकरी संस्कृतीसोबत स्वच्छता व आरोग्याचा दिला संदेश

वारकरी वेषातील विद्यार्थ्यांचा टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष; मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भक्तिमय सोहळा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर, नशिराबाद येथे भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला. वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात “विठ्ठल… विठ्ठल…” नामाचा जयघोष करत काढलेल्या आषाढी दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने झाली. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वारकरी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतून वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा प्रभावीपणे साकारली.यानंतर शाळेच्या पटांगणातून टाळ, मृदुंग आणि पालखीच्या साथीने भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत बालवाडी विभाग, इयत्ता पहिली, दुसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर वारकरीमय झाला.

कार्यक्रमास नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधुकर चौबे, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रवीण महाजन, पालक तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी आजच्या पिढीपर्यंत वारकरी संस्कृती, संतांचे विचार आणि भारतीय संस्कार पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.याच कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबादच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते व आशा सेविका मंगला पिंगळे यांनी “माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव” या उपक्रमांतर्गत जनजागृती केली. स्वच्छ परिसर, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन स्वाती अत्तरदे, नयना भंगाळे, सुनीता शिवरामे आणि स्वाती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले. भक्ती, संस्कार, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या