Friday, April 10, 2026
police dakshta logo
Homeअपघातनशिराबाद महालक्ष्मी चौफुली ठरतेय ‘ब्लॅक स्पॉट’: अपघातांची मालिका सुरूच; चौफुलीवर गतिरोधक व...

नशिराबाद महालक्ष्मी चौफुली ठरतेय ‘ब्लॅक स्पॉट’: अपघातांची मालिका सुरूच; चौफुलीवर गतिरोधक व हायमस्ट नसल्याने अपघातांमध्ये वाढ!

नशिराबाद नगरपरिषदेकडून चार दिवसांपूर्वीच महालक्ष्मी चौफुलीसाठी हायमस्ट दिवे व गतिरोधकांची मागणी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आंदोलनाचा इशारा!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील महालक्ष्मी चौफुलीवर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा तीन वाहनांचा अपघात घडला. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.मात्र, सततच्या अपघातांमुळे या चौफुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे.विशेष म्हणजे, याच समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नशिराबाद नगरपरिषदेकडून चार दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनात चौफुलीवर तातडीने हायमस्ट दिवे बसविणे, गतिरोधक उभारणे तसेच आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार असतो. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना चौफुलीचा अंदाज येत नाही. महालक्ष्मी मंदिराकडे वळण घेताना किंवा नशिराबादकडून भादलीकडे जाताना समोरून येणाऱ्या वाहनांची दिशा लक्षात येत नसल्याने धडकांची शक्यता वाढते.परिणामी, मागील पंधरा दिवसांत येथे अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिकांच्या मते, ही चौफुली अत्यंत धोकादायक वळणावर असूनही येथे ना गतिरोधक आहेत,ना पुरेशी प्रकाशव्यवस्था.यामुळे वाहनचालकांना वेळेवर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नगरपरिषदेने दिलेल्या निवेदनात,जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिक प्रशासन व नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशाराही नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आल्या आहेत.सतत वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरीत पावले उचलणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या