पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या ५५ वर्षीय महिला प्राचार्यांकडून ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ७ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून संबंधित तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्राचार्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत पैशांची मागणी केली. दबाव आणि भीतीमुळे प्राचार्यांनी संबंधित रक्कम दिल्याचे समोर आले आहे. नंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे (सध्या सायबर पोलिस ठाणे), पोलिस अंमलदार सोनाली हिंगे (शिवाजीनगर पोलिस ठाणे) आणि पोलिस अंमलदार सुदाम तायडे (शिवाजीनगर पोलिस ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौकशीदरम्यान प्राथमिकदृष्ट्या दोष आढळल्याने तिघांनाही तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला तडा गेला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

