परिवहन विभागाकडून राज्यभर तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मेपासून मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाच्या ५१ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत विशेष परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेदरम्यान संबंधित चालकांना मराठी वाचन व लेखन येते का, याची पडताळणी करण्यात येणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यात स्थानिक भाषेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

