नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम म्हणून नशिराबाद येथे भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल व श्री स्वामी समर्थ केंद्र, नशिराबाद यांच्या संयुक्त पुढाकारातून हे शिबिर गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. शिबिराचे ठिकाण श्री स्वामी समर्थ केंद्र, न्यू इंग्लिश स्कूल समोरील परिसर असेल.
या शिबिरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार असून, रुग्णांना उच्च दर्जाचे लेन्स बसविण्यात येतील. तसेच निवड झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालयापर्यंत ने-आण, राहण्याची व भोजनाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. डोळ्यांच्या तपासण्या व शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हा उपक्रम विशेष लाभदायक ठरणार आहे.या शिबिरामुळे दृष्टी गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांना पुन्हा स्पष्ट दिसण्याची संधी मिळणार असून, परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
शिबिरासाठी नाममात्र २० रुपयांचे नोंदणी शुल्क ठेवण्यात आले असून, इच्छुकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक गणेश चव्हाण व श्री स्वामी सेवेकरी यांनी केले आहे. “दृष्टी हीच खरी संपत्ती” या भावनेतून अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

