Friday, May 22, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगावात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील काही पेट्रोल पंपांवर पे सीट्रोल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अप्रमाणित संदेश, सोशल मीडियावरील चुकीची माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न करू नये तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी टाळावी. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी केल्यास वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची दक्षता घेण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन आणि संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच चुकीची माहिती प्रसारित करणे हा दंडनीय अपराध असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल किंवा डिझेल संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, जिल्ह्यातील विविध तेल कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा तसेच वाहतूक पुरवठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी शांतता, संयम आणि सहकार्य राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या