मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील पिपरी आका राऊत गावाजवळ काल मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भुसावळवरून मलकापूरकडे जाणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.या दुर्दैवी घटनेत ट्रकमधील एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. सकाळी जळालेला मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत होते.दरम्यान, संबंधित ट्रक नेमका कुठला होता तसेच अपघातग्रस्त दोन्ही व्यक्ती कोणत्या भागातील आहेत, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबतची अधिकृत आणि संपूर्ण माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

