जळगाव | विशेष लेख | पोलीस दक्षता लाईव्ह: खरीप हंगाम २०२७ तोंडावर येऊन ठेपला असून वाढती महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेती निविष्ठांचे वाढलेले दर तसेच जंगली प्राण्यांचा वाढता त्रास यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारी दिलीप चौधरी यांनी केले आहे.शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रात्रंदिवस मेहनत करून शेतीमाल उत्पादित करतात. मात्र बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतमालाची मातीमोल दरात खरेदी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.अल निनोच्या संभाव्य संकटामुळे हवामानात अनिश्चितता निर्माण झाली असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतामध्ये उताराला आडवी मशागत व पेरणी करावी. तसेच चार सरींनंतर एक खोल चर काढल्यास कमी पावसात पाणी जिरण्यास आणि अतिवृष्टीच्या वेळी अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता घरीच तपासून पाहावी, असे आवाहनही त्यांनी केले. ओल्या गोणपाटावर सोयाबीनचे शंभर दाणे ठेवून त्यांची उगवण तपासावी. उगवण क्षमता ७० टक्क्यांपर्यंत असल्यास ते बियाणे पेरणीस योग्य समजावे, असे त्यांनी सांगितले.पेरणीपूर्वी बियाण्यांवर जैविक बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी होण्यास मदत होईल. फवारणीसाठी निंबोळी अर्काचा वापर करावा तसेच युरियाचा वापर मर्यादित ठेवावा. पीक एक महिन्याचे झाल्यानंतर जीवामृताची फवारणी केल्यास पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढून पीक निरोगी राहण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.पिकावर कीड आढळल्यास सुरुवातीला रासायनिक औषधांची फवारणी न करता निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेतात जागोजागी पक्षी थांबे उभारल्यास पक्षी पिकावरील अळ्या खाऊन नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रणास मदत करतात. फवारणी करताना तीव्र रासायनिक औषधांचा वापर टाळून टप्प्याटप्प्याने फवारणी करावी. तसेच नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी बांधावरील झाडांची तोड टाळावी. शेतीकामास अडथळा येत असल्यास केवळ फांद्या छाटाव्यात. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक शेतकरी व नागरिकाने दरवर्षी किमान दोन झाडे लावून ती जिवंत ठेवण्याचा संकल्प करावा आणि वृक्षलागवडीकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन दिलीप चौधरी यांनी केले.
श्री.दिलीप चौधरी
मा. कृषी अधिकारी तथा,
जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारी.
पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्य.

