नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे समाजसेवेची भावना जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला. प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंत तपासणी व सल्ला शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये नशिराबादसह परिसरातील तब्बल ७० नागरिकांची मोफत दंत व मुख आरोग्य तपासणी करण्यात आली.न्यू इंग्लिश स्कूलसमोरील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. दंत आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असल्याने उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन
प्रसिद्ध रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. युवराज रोटे (B.D.S., M.D.S.) आणि डॉ. हरीश काळे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची सखोल तपासणी केली. दातांच्या विविध समस्या, तोंडाच्या आजारांपासून बचाव, आधुनिक उपचार पद्धती तसेच शस्त्रक्रियांविषयी त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी विशेष सवलतीचे डिस्काउंट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सामाजिक कार्याला मान्यवरांची दाद
या उपक्रमासाठी रोहिदास बाबा, गणेश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष – अजित पवार गट), मुकुंदा रोटे (मनसे जिल्हाध्यक्ष, जळगाव), रोहिदास पाटील तसेच देविदास पाटील (स्वामी केंद्रप्रमुख, नशिराबाद) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.शिबिरादरम्यान नागराज महाजन आणि डॉ. प्रमोद आमोदकर यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे आरोग्यदायी उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी परिवार, नशिराबाद आणि आयोजक टीमच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये पवन मराठे, पूर्वेश येवले, हितेश पाटील, युवराज मराठे, सचिन घोडकर, रोहन महाजन, जयेश पाटील, शुभम भावसार, तुषार रंधे, महेंद्र मराठे, अजय राणे, निलेश सुतार आणि प्रवीण मिस्तरी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन नेटकेपणाने पार पाडले.
या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दंत आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून परिसरात उपक्रमाचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक होत आहे.

