Thursday, June 4, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; युवक-युवतींना स्वसंरक्षण व संस्कारांची संधी

शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; युवक-युवतींना स्वसंरक्षण व संस्कारांची संधी

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात युवक-युवतींसह महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वसंरक्षणासाठी सज्ज असणे आवश्यक बनले आहे. याच उद्देशाने भुसावळ शहरात सहा दिवसीय शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रशिक्षण शिबिर ६ ते १४ जून दरम्यान सकाळी व सायंकाळी नियोजित वेळेत संतोषी माता हॉल परिसरातील जय मातृभूमी क्रीडा मैदानावर होणार आहे.

या शिबिरामध्ये भारतीय पारंपरिक व्यायामप्रकार, दंड-बैठका, लाठी-काठी, तलवारबाजीची प्राथमिक माहिती, दांडपट्टा, भाला तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या साहाय्याने स्वसंरक्षणाची तंत्रे शिकविण्यात येणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि बौद्धिक विकास घडविण्यासाठी भारतीय बौद्धिक खेळांचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.भारतीय संस्कृती, इतिहास, रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित प्रेरणादायी विचारमंथन तसेच राष्ट्रभक्ती व चारित्र्य संवर्धनाचे धडेही प्रशिक्षणाचा भाग असतील. त्यामुळे शारीरिक प्रशिक्षणासोबतच वैचारिक व सांस्कृतिक जडणघडीलाही चालना मिळणार आहे.

या शिबिरासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून सुमारे ६ ते ६० वर्षे वयोगटातील इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. रायगड येथील अनुभवी प्रशिक्षक आशिष खरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.जास्तीत जास्त युवक, युवती आणि महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे. शारीरिक तंदुरुस्ती, स्वसंरक्षण कौशल्य आणि राष्ट्राभिमान यांचा संगम असलेल्या या शिबिरामुळे सहभागींच्या सर्वांगीण विकासास हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या