Saturday, June 13, 2026
police dakshta logo
Homeजळगावजिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज; 13 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज; 13 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. जलस्रोतांचे प्रभावी नियोजन, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील 13 गावांमध्ये 20 खासगी टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील 3 गावे, भुसावळ तालुक्यातील 1 गाव, अमळनेर तालुक्यातील 8 गावे आणि पारोळा तालुक्यातील 1 गावाचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे सुमारे 1 लाख 19 हजार 606 नागरिकांना दिलासा मिळत आहे.पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 56 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक 14 विहिरी मुक्ताईनगर तालुक्यात, 14 विहिरी अमळनेर तालुक्यात तर 11 विहिरी जामनेर तालुक्यात अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील 10 ठिकाणी टँकरसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जळगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव आणि चोपडा या तालुक्यांतील कोणत्याही गावाला सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासलेली नाही, ही बाब समाधानकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.पाणीटंचाईग्रस्त भागांवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना पुरेसा, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्परतेने राबविल्या जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या