Saturday, June 13, 2026
police dakshta logo
Homeजळगावमोठी बातमी: रेश्मा काळे यांची निवडणुकीतून माघार; नंदकिशोर महाजनांना जाहीर पाठिंबा

मोठी बातमी: रेश्मा काळे यांची निवडणुकीतून माघार; नंदकिशोर महाजनांना जाहीर पाठिंबा

महायुतीतील अंतर्गत पेच अखेर मिटला; जळगाव विधानपरिषद निवडणुकीचे समीकरण बदलले

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रेश्मा कुंदन काळे यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे जळगावमधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे मानले जात आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठी चर्चा रंगली होती. शिवसेनेकडून या जागेसाठी विविध नावांची चर्चा होत असताना अखेरीस ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि पक्षाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी बहाल केली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नसल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.दरम्यान, नाशिक आणि जळगाव येथील राजकीय घडामोडी परस्परांशी जोडल्या गेल्याची चर्चा सुरू होती. नाशिकमध्ये निर्माण झालेला राजकीय तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्यानंतर जळगावातील परिस्थितीतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार महायुतीतील मतभेद मिटविण्यासाठी विविध स्तरांवर बैठका आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.याच पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर रेश्मा काळे यांच्या भूमिकेबाबत सकारात्मक संकेत मिळाले होते. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय निश्चित केला.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेश्मा काळे यांनी महायुतीची एकजूट कायम ठेवण्यासाठी आपण नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे जळगावमधील निवडणुकीचा पेच संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव निवडणूक रिंगणात कायम असले तरी त्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांची राजकीय ताकद आता महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने उभी राहणार आहे. परिणामी विधानपरिषद निवडणुकीत आता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या