Wednesday, June 17, 2026
police dakshta logo
Homeचाळीसगावचाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी...

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी जेरबंद

८० हजारांच्या दोन दुचाकी जप्त; संशयितासह आणखी एक मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच स्वतंत्र कारवाईत एका संशयित इसमासह २५ हजार रुपये किंमतीची विनानंबर प्लेटची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.दिनांक १४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीस गेलेली HF डिलक्स मोटारसायकल चाळीसगाव येथील राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरली आहे.

माहितीची खात्री करून पोलिसांनी राहुल भिसे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने चोरीची HF डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला विकल्याची कबुली दिली.यानंतर पोलिसांनी प्रशांत राजपूत यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राहुल भिसे याने सदर मोटारसायकल त्याला २० हजार रुपयांत विकल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकलचे आरसी बुक मागितल्यावर राहुल भिसे याने नंतर देतो असे सांगून टाळाटाळ केल्याची माहितीही प्रशांत राजपूत याने दिली.या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

दरम्यान, त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले.त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे संशयित इसमासह त्याच्या ताब्यातील सुमारे २५ हजार रुपये किंमतीची यामाहा कंपनीची FZ मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोको राहुल पाटील व पोका भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या