अॅमेझॉन पार्सलचे आमिष दाखवून घरात प्रवेश; बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम लंपास
पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा शहरात भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. अॅमेझॉनचे पार्सल आल्याचे खोटे सांगून घरात प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, व्यवसाय – शेती, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, सध्या रा. लक्ष्मी आंगण कॉलनी, शक्तीधामच्या पाठीमागे, पाचोरा) या आपल्या घरी असताना आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर व त्याच्या साथीदारांनी अॅमेझॉनचे पार्सल आल्याचे सांगून जबरदस्तीने घरात प्रवेश केला.आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या दोन मुली व मुलाला एका ठिकाणी बसवून बंदुकीचा धाक दाखवला. घरात सोन्याच्या चिपा असल्याचे सांगत त्या देण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेली ७ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये किमतीची रक्कम घेऊन आरोपी पसार झाले.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. दि. १३ जून २०२६ रोजी आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याचा सहभाग निष्पन्न झाला.तसेच अनोळखी आरोपींपैकी योगेश परशराम शिंदे (वय ३१, व्यवसाय – खासगी नोकरी, रा. प्लॉट क्र. ४९/५०, दर्शन कॉम्प्लेक्स, फ्लॅट क्र. १८, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यासही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील ७,७०० रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले खेळण्यातील बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.तपासादरम्यान असे उघड झाले की, आरोपी गोकुळ वाघ याला फिर्यादींच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती मिळाली होती. त्याने ही माहिती त्याचा मित्र नितीन पाटील याला दिली. नितीन पाटील याने आपल्या परिचयातील दोन व्यक्तींना बोलावून घेतले व आरोपी चेतन भुतेकर याच्यासह फिर्यादींच्या घरात जबरी चोरीचा कट रचला. प्राथमिक तपासात गोकुळ वाघ व नितीन पाटील यांनी गुन्ह्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वापुसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी, नितीन भालेराव आदींच्या पथकाने केली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

