Monday, June 29, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापेरणीदरम्यान विजेचा धक्का लागून बैल ठार: गोजोरे येथील घटना; शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची...

पेरणीदरम्यान विजेचा धक्का लागून बैल ठार: गोजोरे येथील घटना; शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची मागणी!

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगावजवळ असलेल्या गोजोरे येथे शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. या घटनेत अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचा बैल जागीच ठार झाला असून दुसरा बैल थोडक्यात बचावला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोजोरे-कुऱ्हा पानाचे रस्त्यालगत गट क्रमांक १६७ मधील ज्ञानेश्वर एकनाथ तळेले यांच्या शेतात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पेरणीचे काम सुरू होते. पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. पेरणी करताना लोखंडी विजेच्या खांबाजवळ औत गेल्यानंतर खांबातून विजप्रवाह जमिनीत उतरलेला असल्याने एका बैलाला विजेचा जोरदार धक्का बसला. यात बैल जागीच ठार झाला.दरम्यान, दुसरा बैल शेतकरी ज्ञानेश्वर तळेले व चेतन तळेले यांनी पायात चप्पल घालून तत्काळ सोडवल्याने मोठा अनर्थ टळला. पेरणीचे एक औत लोखंडी तर दुसरे लाकडी असल्याने ज्ञानेश्वर तळेले, वंदना तळेले, सरला तळेले व चेतन तळेले यांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणचे अभियंता नयन गावंडे तसेच कर्मचारी भैय्या जंगम, मनोज चौधरी व पंकज जंगले यांनी तत्काळ विजपुरवठा खंडित करून पाहणी केली. यावेळी दोन विज खांबांतून विजप्रवाह जमिनीत उतरत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती त्यांनी पोलिसांसमोर दिली.यानंतर शेतकरी ज्ञानेश्वर तळेले यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुऱ्हा पानाचे आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी विकास बाविस्कर व सचिन पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राणे यांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले.ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असून महावितरणने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच परिसरातील शेतशिवारातील विजेचे खांब व तारांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी पोलीस पाटील विनोद सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, भागवत कोळी, धनराज वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विकास बाविस्कर करीत आहेत.दरम्यान, पावसाळ्यात तुटलेल्या विजतारा, लोखंडी विजखांब अथवा विजप्रवाह असलेल्या सिमेंट खांबांना स्पर्श करू नये. संशयास्पद परिस्थिती आढळल्यास तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अभियंता नयन गावंडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या