नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-उमाळा रस्त्यावरील भाग्यवर्धन कंपनीकडून कथितरित्या सोडण्यात येणाऱ्या रासायनिक व प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि जनावरे गंभीर समस्यांना सामोरे जात असल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणी आता शेतकऱ्यांनी थेट नशिराबाद नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित कंपनीविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नगरपरिषदेकडे शेतकऱ्यांची लेखी तक्रार
या संदर्भात उमाळा रोड परिसरातील शेतकरी तथा देश विदेश लिकरचे भागीदार सुरेश जुमडामल संगतानी यांनी दिनांक २९ जून २०२६ रोजी नशिराबाद नगरपरिषदेकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जामध्ये भाग्यवर्धन कंपनीकडून कोणतीही योग्य प्रक्रिया न करता केमिकलयुक्त दूषित सांडपाणी थेट परिसरात व शेतजमिनींकडे सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण होत असून डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विहीर, बोअरवेल यांसारखे पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पूर्वीच्या वृत्तानंतर पाण्याचा प्रवाह शेतांकडे वळवल्याचा आरोप
या संदर्भातील वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर नशिराबाद नगरपरिषद अध्यक्षांनी संबंधित परिसराची पाहणी करून चौकशी केली होती. मात्र त्यानंतर लगेचच कंपनीकडून रस्त्यावर वाहणारे दूषित पाणी दुसऱ्या बाजूला वळवून थेट शेताच्या दिशेने सोडण्यात आल्याचा आरोप नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे.यामुळे आता या प्रदूषित पाण्याचा फटका थेट शेतीला बसत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शेतजमिनींची सुपीकता कमी होण्यासोबतच पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कंपनीत कोणते काम केले जाते?
सदर कंपनीमध्ये वेस्टेजपासून पुठ्ठा निर्मिती तसेच वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून प्लास्टिक दाणा तयार करण्याचे काम केले जाते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असून त्यावर योग्य प्रक्रिया न करता ते उघड्यावर सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कंपनी परिसरालगतच्या पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचून राहत असल्याचे सांगितले जात आहे. हे पाणी रस्त्याच्या कडेला वाहत थेट खंडेराव मंदिर परिसरापर्यंत पोहोचत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
जनावरांच्या मृत्यूचाही आरोप
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे यापूर्वी काही जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या साचलेल्या पाण्यावर जाळीसारखा थर तयार झालेला दिसून येत असून त्यामध्ये रासायनिक घटक मिसळले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.या प्रकारामुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर नाराजी
या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारीनंतर काही दिवसांसाठी दूषित पाणी सोडणे बंद केले जाते, मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नियमानुसार संबंधित कंपनीने एमआयडीसीचे पाणी वापरणे बंधनकारक असताना परिसरातील इतर स्रोतांमधील पाणी वापरले जात असल्याची चर्चा आहे. तसेच कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी योग्य प्रक्रिया करून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक असताना ते थेट रस्त्यावर किंवा परिसरात सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या सर्व प्रकारामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता किंवा संगनमत आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
नशिराबाद नगरपरिषदेकडून कारवाई सुरू असल्याचे नगराध्यक्ष यांची माहिती
नशिराबाद नगरपरिषदेकडून संबंधित कंपनीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. याबाबत नगराध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या पथकाकडून संबंधित कंपनीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. तसेच कंपनीकडून सोडण्यात येणाऱ्या वेस्टेज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक ती कारवाई तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचा इशारा
प्रदूषण नियंत्रण मंडळ, नशिराबाद नगरपरिषद तसेच आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी दिला आहे.

