Tuesday, June 30, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; गैरव्यवहाराच्या चौकशीचीही मागणी

नशिराबाद नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; गैरव्यवहाराच्या चौकशीचीही मागणी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आर. आर. सोनवणे हे मागील पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ बदलीसह विविध कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ साधारणतः तीन वर्षांचा असतो. मात्र, श्री. सोनवणे हे २२ मार्च २०२२ पासून नशिराबाद नगरपरिषदेत कार्यरत असून त्यांची अद्याप बदली झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच मागील काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर एकाच ठेकेदाराला दिले जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार व मुख्याधिकारी यांच्यात जवळचे संबंध असून कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे दिली जात असल्याची गावात चर्चा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.घनकचरा विभागातील कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य पुरविले जात नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मागील वर्षी सफाई कामगार विशाल चिरावंडे यांचा साफसफाई करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच कामगारांना पीएफ, पेमेंट स्लिप यांसारख्या सुविधा व माहिती वेळेवर मिळत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीतही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित निधी वेळेत मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, नशिराबाद शहरात पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसाआड होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. गावासाठी मंजूर असलेली ५७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तक्रार करणाऱ्यांशी मुख्याधिकारी अरेरावीची भाषा वापरत असल्याचाही आरोप करण्यात आला असून, “माझे वरपर्यंत हात आहेत” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय संबंधित अधिकारी गावात वास्तव्यास नसतानाही शासनाकडून दरमहा घरभाडे भत्ता घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त तसेच प्रधान सचिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या