नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-उमाळा रस्त्यावरील भाग्यवर्धन कंपनीकडून कथितरित्या सोडण्यात येणाऱ्या रासायनिक व प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि जनावरे गंभीर समस्यांना सामोरे जात असल्याचा आरोप होत असतानाच आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी संबंधित परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी, डासांचे वाढते प्रमाण तसेच शेती आणि जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच काही जनावरे दूषित पाणी पिल्याने दगावल्याचाही आरोप स्थानिकांनी केला.
यापूर्वी या प्रकरणी उमाळा रोड परिसरातील शेतकरी तथा देश विदेश लिकरचे भागीदार सुरेश जुमडामल संगतानी यांनी नशिराबाद नगरपरिषदेकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीनंतर नगरपरिषदेकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली असून सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत लवकरात लवकर या समस्येचे निवारण न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच संबंधित ठिकाणी बाहेरील मजूर कार्यरत असून स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळ, नशिराबाद नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.

