नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी तथा बीएसएनएल जळगाव येथील सेवानिवृत्त सहाय्यक महाप्रबंधक जे.एस.किनगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या घडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.तसेच संस्थेच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरसेवक वासिफ अली यांनीही संस्थेच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट उपलब्ध करून देणारे डॉ. कांतीलाल नारखेडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका एस.ए.बनसोडे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा मांडला.

गुणगौरव सोहळ्यात विविध दात्यांनी दिलेल्या ठेवींच्या व्याजातून तसेच रोख स्वरूपातील निधीतून सुमारे २२ हजार रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी पूजा पाटील, द्वितीय क्रमांकाची वनिता तळेले, तृतीय क्रमांकाची भूमिका गायकवाड व देवयानी महाजन यांच्यासह लिखित पाटील, उत्कर्षा पाटील, शर्वरी करुळे, धनंजय उघडे, दिव्या जावडे, गणेश कोडी, ललित नारखेडे, सोनाक्षी सुरवाडे, कृष्णा मोरे आणि खुशी चौधरी या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

शाळेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक सक्षम मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. वर्धापन दिनानिमित्त शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून संस्थेची परंपरा जपण्यात आली.कार्यक्रमात बक्षीस वाचन राजू पाचपांडे, जी.टी.पाटील आणि एन.सी.भिरूड यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.ओ.चौधरी व सौ.जी.एस.महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी.टी.पाटील यांनी मानले.

