Wednesday, July 15, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजिल्हा बँकेच्या संचालकांविरोधातील तक्रारीची गंभीर दखल: नाशिक विभागीय सहनिबंधकांचे चौकशीचे आदेश; वस्तुस्थितीदर्शक...

जिल्हा बँकेच्या संचालकांविरोधातील तक्रारीची गंभीर दखल: नाशिक विभागीय सहनिबंधकांचे चौकशीचे आदेश; वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची नाशिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांना सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील दोन स्वतंत्र पत्रे दि. १३ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आली आहेत.पहिल्या पत्रानुसार, बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वे तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अपात्रतेची कार्यवाही करण्याबाबत करण्यात आलेल्या निवेदनाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रासह तक्रारदार सुरेशआप्पा गो. पाटील (रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली आहे.दुसऱ्या पत्रात बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, RBI च्या मार्गदर्शक सूचना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी न करता मागील सुमारे २२ महिन्यांपासून कथित नियमबाह्य कारभार झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चौकशीनंतर संबंधित अधिकारी व संचालकांवर आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.दोन्ही पत्रांमध्ये तक्रारदार सुरेशआप्पा गो. पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्थानिक स्तरावर सखोल पडताळणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.या आदेशांमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारासंदर्भातील प्रशासकीय आणि संभाव्य कायदेशीर कार्यवाहीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या