नमुना ८-अ धारक नागरिकांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळावा; अन्यथा १५ दिवसांत आंदोलनाचा इशारा
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगर परिषद हद्दीतील भवानी नगर परिसरात राहणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विशेष सर्वेक्षण करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनदल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालयालाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की, भवानी नगर परिसरातील अनेक कुटुंबे कच्च्या व जीर्ण घरांमध्ये राहत असून अनेक घरे झोपडपट्टीसदृश अवस्थेत आहेत. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी गळते, तर सुरक्षित निवाऱ्याचाही अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.परिसरातील बहुतांश नागरिकांकडे ७/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा नसून केवळ नमुना ८-अ उपलब्ध असल्यामुळे त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांत या परिसरातील एकाही पात्र गरीब कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर भवानी नगर परिसराचे तातडीने विशेष सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करावी, मागील पाच वर्षांत लाभ का मिळाला नाही याची सखोल चौकशी करावी, नमुना ८-अ धारक नागरिकांबाबत शासनाकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना मागवून त्यानुसार कार्यवाही करावी, पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून घरकुलाचा लाभ द्यावा तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा भवानी नगरातील नागरिकांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जळगाव जिल्हा जनदल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी निवेदनातून दिला आहे.