निकृष्ट दर्जाच्या कामांचा आरोप; संबंधित मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संबंधित मक्तेदाराच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नशिराबाद येथील दीपक भालचंद्र बोंडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनानुसार, फैजपूर येथील मक्तेदार शेख कलीम शेख सलीम यांनी मागील काही वर्षांत नशिराबाद नगर परिषद हद्दीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटारी, कंपाऊंड भिंती, धापे आदी विविध विकासकामे केली आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित सर्व कामांची तांत्रिक व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, निकृष्ट दर्जाची कामे होत असतानाही संबंधित मक्तेदाराची बिले कशा आधारावर अदा करण्यात आली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांनी कामांकडे दुर्लक्ष केले असून, त्यांच्या संगनमतातूनच निकृष्ट दर्जाच्या कामांची देयके मंजूर झाल्याचा आरोपही अर्जदाराने केला आहे.याशिवाय, गेल्या पाच वर्षांपासून एकाच मक्तेदाराला सातत्याने नगर परिषदेची कामे कशी मिळत आहेत, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित मक्तेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून भविष्यात नशिराबाद नगर परिषदेकडील कोणतेही काम देऊ नये, तसेच दोषी आढळणाऱ्या मक्तेदार, मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.