Tuesday, July 14, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअपर तहसील कार्यालयासाठी नशिराबादच योग्य; निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी: उपनगराध्यक्ष पंकज महाजन...

अपर तहसील कार्यालयासाठी नशिराबादच योग्य; निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी: उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन!

ग्रामीण नागरिकांच्या हितासाठी अपर तहसील कार्यालय नशिराबादमध्येच व्हावे: अपर तहसील कार्यालयाच्या स्थानाबाबत नव्याने वाद; नशिराबादच्या बाजूने जोरदार पाठपुरावा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने जळगाव तालुक्यास मंजूर केलेले प्रस्तावित अपर तहसील कार्यालय जळगाव शहराऐवजी नशिराबाद येथेच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती पंकज शामकांत महाजन यांनी अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर केलेल्या सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे.महाजन यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देणे हा अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. अशा परिस्थितीत हे कार्यालय जळगाव शहरात सुरू झाल्यास ग्रामीण नागरिकांना अपेक्षित सुविधा व लाभ मिळणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.निवेदनानुसार नशिराबाद, कानळदा, भोकर, आसोदा, शिरसोली आणि म्हसावद या महसुली मंडळांसाठी नशिराबाद हे भौगोलिकदृष्ट्या अधिक सोयीचे केंद्र आहे. राष्ट्रीय महामार्गालगतचे स्थान, उत्कृष्ट दळणवळण व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहज पोहोचता येण्याची सुविधा यामुळे अपर तहसील कार्यालयासाठी नशिराबाद हा सर्वाधिक योग्य पर्याय असल्याचा दावा करण्यात आला आहे.याशिवाय, नशिराबाद नगरपरिषदेकडून कार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय उभारणीसाठी जागा किंवा मूलभूत सुविधांबाबत कोणताही प्रशासकीय अथवा आर्थिक अडथळा निर्माण होणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हरकतीबाबत देण्यात आलेल्या निर्णयाचा वस्तुनिष्ठ निकषांवर पुनर्विचार करून सुधारित अहवाल शासनाकडे सादर करावा तसेच जळगाव तालुक्यास मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय नशिराबाद येथेच स्थापन करण्याची शिफारस करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.प्रशासनाने ग्रामीण भागाच्या व्यापक हिताचा विचार करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर याविषयी प्रांत अधिकारी विनय गोसावी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले.दरम्यान, निवेदन सादर करताना नशिराबाद नगरपरिषदेचे आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे, नगरसेवक संदीप पाटील, शिवसेना कार्यकर्ते विकास धनगर, तसेच सामाजिक कार्यकर्ते नारखेडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या