नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांचे नुकसानग्रस्ताला मदत मिळवून देण्याचे आश्वासन, तसेच नागरिकांना केले सतर्कतेचे आवाहन!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील हेडकर मोहल्ला परिसरात सिव्हिल हॉस्पिटलजवळील अत्यंत वर्दळीच्या भागात वन्य प्राणी लांडग्याने शिरकाव करून बकऱ्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तीन बकऱ्या व एक बोकड ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नशिराबादचे तलाठी रुपेश ठाकूर यांना माहिती देण्यात आली त्यांनी याबाबत वनविभागाला सूचना दिली. काही वेळात वन विभागाचे वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक हरीश थोरात (उमाळा) व वनरक्षक स्वप्निल गोसावी (मेहरुण) यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून घटनेची नोंद केली. तसेच परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि वन्य प्राणी आढळल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या.या घटनेतील नुकसानग्रस्त बकरी मालक शेख इरफान शेख नूर (रा. हेडकर मोहल्ला, नशिराबाद) यांच्या राहत्या घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच नुकसानग्रस्ताला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली आढळल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.