सकाळी ५ वाजताच लाईट बंद केल्याने अपघात, चोरी व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता; संबंधितांवर कारवाईची मागणी
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील जळगाव–नशिराबाद उड्डाणपूल तसेच नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे दररोज पहाटे सुमारे ५ वाजताच बंद करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या वेळी अद्याप पुरेसा उजेड झालेला नसताना दिवे बंद होत असल्याने अपघात, चोरी तसेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, विद्यार्थी, महिला व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पथदिवे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आले असतानाही त्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सकाळी अंधार असतानाच दिवे बंद केले जात असल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पहाटे शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.याउलट, काहीवेळा संध्याकाळी अजूनही नैसर्गिक उजेड असतानाच पथदिवे सुरू करण्यात येत असल्याने या संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पथदिवे सुरू-बंद करण्यामागील निकष काय आहेत, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणीही होत आहे.नागरिकांच्या माहितीनुसार, या प्रश्नाबाबत नशिराबाद नगरपरिषद तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही संबंधित महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, आजपर्यंत या तक्रारींची कोणतीही प्रभावी दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करून पथदिव्यांच्या वेळापत्रकात आवश्यक सुधारणा कराव्यात. तसेच नशिराबाद पोलीस ठाण्यानेही सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना द्याव्यात आणि नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नशिराबादकरांकडून करण्यात येत आहे.