Monday, July 13, 2026
police dakshta logo
Homeजळगावलग्नानंतर अवघ्या सहा दिवसांत नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; विद्यापीठासमोर भरधाव कारची दुचाकीला धडक

लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांत नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; विद्यापीठासमोर भरधाव कारची दुचाकीला धडक

माहेरी जात असताना अपघात; २१ वर्षीय वैशाली पाटील जागीच ठार, काका गंभीर जखमी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत २१ वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे काका गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर (गुजरात पेट्रोल पंप परिसर) येथील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता.विवाहानंतर देवदर्शन करून हे दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच जळगावात परतले होते.
सोमवारी वैशाली यांचे काका त्यांना माहेरी कोळपिंप्री येथे घेऊन जाण्यासाठी सासरी आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघे दुचाकीवरून माहेरी जाण्यासाठी निघाले. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या काकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. विवाहानंतर अवघ्या सहा दिवसांतच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेण्याबरोबरच पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या