बस चालविताना मोबाईलवर संभाषण; चौकशी करून कडक कारवाईची मागणी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एमएच-१३-सीयू-६९३१ क्रमांकाच्या बसचा चालक बस चालवित असताना मोबाईल फोनवर वारंवार संभाषण करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बस वेगात असताना एका हाताने स्टेअरिंग धरून मोबाईलचा वापर केल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी संबंधित घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा दावा केला असून, हा व्हिडिओ पुरावा संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन असून त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.या घटनेची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित चालकाची जबाबदारी निश्चित करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. तसेच संबंधित आगार प्रशासन, विभागीय नियंत्रक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ तसेच उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणाबाबत एसटी महामंडळ प्रशासन कोणती भूमिका घेते आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करते का, याकडे प्रवासी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, आरोपांची अधिकृत चौकशी पूर्ण होणे आणि त्यानंतरचा अहवाल समोर येणे बाकी आहे.