Wednesday, July 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमपहाटे २ वाजता मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांचे धडक सर्च ऑपरेशन; अंतरराज्यीय कारवाईत...

पहाटे २ वाजता मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांचे धडक सर्च ऑपरेशन; अंतरराज्यीय कारवाईत २ देशी कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने व शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली ४०० हून अधिक पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सहभाग; फरार आरोपींच्या शोधासाठी पार उमरटी येथे मोठी कॉम्बिंग मोहीम

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रास्त्रांच्या निर्मिती व तस्करीवर आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलीस दलाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग सर्च’ राबवले. ही मोहीम मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या नेतृत्वात पार पडली.ही कारवाई मध्यरात्री सुमारे १ वाजता पथक रवाना झाल्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पार उमरटी येथे राबविण्यात आली. पहाटेच्या सुमारास परिसराला वेढा घालत संशयित ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या धडक कारवाईत ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींच्या शोधासाठी मोहीम
सदर मोहीम चोपडा शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १०३/२०१६ (भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) व शस्त्र अधिनियम कलम ३/२५), चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २२/२०२५ (शस्त्र अधिनियम कलम ३/२५) तसेच नाशिक ग्रामीणच्या पवारवाडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १७५/२०२६ (शस्त्र अधिनियम कलम ३, ७, २५) या गंभीर गुन्ह्यांतील फरार व संशयित आरोपींच्या शोधासाठी आयोजित करण्यात आली होती.

अपर एसपी अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस ताफा
कारवाईचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) यांनी केले. त्यांच्यासमवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे (जळगाव), विनायक कोते (अमळनेर), केदार बारबोले (भुसावळ), सुनील पाटील (चोपडा), सुधीर पाटील (शिरपूर), तसेच स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक पवन देसले, चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि नियंत्रण कक्ष धुळेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, ३५ दुय्यम पोलीस अधिकारी व २४० पोलीस अंमलदार, नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार तसेच धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार असा एकूण ४०० हून अधिक पोलीस ताफा व २० शासकीय वाहनांचा सहभाग होता.

४५ घरांची झडती, १२ संशयित ताब्यात
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी ४५ संशयित घरांची कसून झडती घेतली. याशिवाय २० संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली असून १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

२ देशी कट्टे, जिवंत काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीचा कच्चा माल जप्त
कारवाईदरम्यान चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याशी संबंधित दोन संशयितांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडून २ देशी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे (राउंड) जप्त करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणावर देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, साचे आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

३२ संशयित मोटारसायकली जप्त
या विशेष मोहिमेत महाराष्ट्र पासिंगसह एकूण ३२ संशयित मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांची मालकी, वापर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

२७ फरार आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग केले आहे. भविष्यातील तपास आणि कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी या माहितीचा वापर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवैध शस्त्रनिर्मिती आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई
अंतरराज्यीय पातळीवर राबविण्यात आलेल्या या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमुळे अवैध शस्त्रनिर्मिती, शस्त्रांची तस्करी आणि फरार आरोपींविरुद्धच्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या