Wednesday, July 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद शिवारात मानवी कवटी आढळल्याने खळबळ; फॉरेन्सिक तपासासाठी नमुने नाशिक व धुळे...

नशिराबाद शिवारात मानवी कवटी आढळल्याने खळबळ; फॉरेन्सिक तपासासाठी नमुने नाशिक व धुळे येथे रवाना

संपूर्ण शेत दाट बाभळीच्या झाडांनी व्यापले असल्याने या परिसरात विविध बेकायदेशीर प्रकार घडत असल्याची चर्चा!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील महालक्ष्मी चौफुलीजवळील शिवारात मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना डॉ. दिलीप चौधरी (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या नशिराबाद शिवारातील गट क्रमांक ९८५ मधील पडीक शेतात उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित कवटी फॉरेन्सिक तपासणीसाठी नाशिक व धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी नशिराबाद पोलिस स्टेशनला मानवी कवटी आढळल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून संपूर्ण शेताची तपासणी केली. कवटी ज्या ठिकाणी आढळून आली त्या परिसरात तसेच संपूर्ण शेतात इतर कोणतेही मानवी अवशेष, हाडे किंवा संशयास्पद वस्तू आढळतात का, याचा सखोल शोध घेण्यात आला. मात्र, मानवी कवटी व्यतिरिक्त अन्य कोणतेही अवशेष आढळून आले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.यानंतर पोलिसांनी संबंधित कवटी ताब्यात घेऊन पंचनामा केला. पुढील वैज्ञानिक तपासासाठी तिचे नमुने नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची आहे तसेच तिची ओळख पटविण्यासंदर्भात पुढील तपासाला दिशा मिळणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ज्या शेतात ही कवटी आढळली ते शेत अनेक वर्षांपासून पडीक असून तेथे मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढली आहेत. संपूर्ण शेत दाट झाडीने व्यापले असल्याने या परिसरात विविध बेकायदेशीर प्रकार घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे संबंधित शेतातील बाभळीची झाडे तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.मानवी कवटी नेमकी कोणाची आहे, संबंधित व्यक्तीसोबत नेमके काय घडले, कवटी त्या ठिकाणी कशी आली, हा प्रकार जुना आहे की अलीकडील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले की, “घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास अधिक वेगाने करण्यात येईल.”

या प्रकरणाचा अधिक तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या