कुऱ्हा पानाचे येथे रेणुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन
भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- सुनसगाव येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथे रेणुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत दरेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षेबाबत सदैव सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या फसवणुकींना सामोरे जावे लागत आहे. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये. मोबाईलवर प्राप्त होणारे संशयास्पद दूरध्वनी, संदेश अथवा लिंकला प्रतिसाद देताना विशेष काळजी घ्यावी. तसेच बँक खाते क्रमांक, एटीएम, ओटीपी, पासवर्ड यांसह कोणतीही वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा सल्ला श्री. दरेकर यांनी दिला.घरातून बाहेर पडताना तसेच प्रवास करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता कायदेशीर मदत घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव ही समाजाची मोठी ताकद आहे. मात्र, सुरक्षित आणि निरोगी जीवनासाठी सतर्कता व काळजी तितकीच महत्त्वाची आहे,” असे श्री. दरेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रेणुका ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षितता आणि फसवणुकीविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अरविंद बावस्कर यांनी केले, तर कळसकर सर यांनी आभार मानले.