जळगाव : पिंप्राळा उपनगरातील हरी विठ्ठल नगर, खंडेराव नगर व हुडको परिसरातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड कामगार तसेच बांधकाम कामगारांसाठी २ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बाल व महिला सुरक्षा अभियान महाराष्ट्र राज्याच्या मुख्य संयोजक तथा संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आले.शिबिरात पिरामल फाऊंडेशनचे डॉक्टर अनंत जोशी व सिस्टर कविता सपकाळे यांनी कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व आवश्यक सल्ला दिला. यावेळी एकूण १३५ कामगारांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऊसतोड कामगार ओळखपत्र नोंदणी अभियानाची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनी उपस्थित कामगारांना दिली.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाल व महिला सुरक्षा अभियानाच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, या केंद्रामध्ये मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुलांना नियमितपणे वर्गात पाठवून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले.यावेळी सौ. वर्षा प्रदीप पाटील यांनी कामगारांच्या हक्कांबाबत तसेच कामगार हेल्पलाइनविषयी माहिती दिली. काही कामगारांचे आधारकार्ड अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आल्याने तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लवकरच आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उत्तर महाराष्ट्रातील एकही ऊसतोड कामगार शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी बाल व महिला सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नगरसेवक अतुल बारी, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील, कल्पेश मराठे, समाधान कोळी यांच्यासह बाल व महिला सुरक्षा अभियानाची टीम उपस्थित होती.