नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषद व प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत एकल महिलांच्या प्रश्न, गरजा व शासकीय योजनांशी संबंधित माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले “विशेष एकल महिला सर्वेक्षण सहाय्यता शिबिर” आज उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.या शिबिरात तब्बल १२० एकल महिलांनी सहभाग नोंदवून सर्वेक्षणाची माहिती दिली. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांची माहिती व अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.शिबिराचे संपूर्ण आयोजन व नियोजन प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सय्यद वासिफ अली (वासिफ सर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. महिलांना सर्वेक्षण प्रक्रियेत आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. स्वयंसेवकांच्या उत्कृष्ट नियोजन, सहकार्य आणि मेहनतीमुळे शिबिर सुरळीत व यशस्वीपणे पार पडले.यावेळी सहभागी महिलांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. एकल महिलांपर्यंत शासकीय योजना व त्यांच्या हक्कांची माहिती पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.“एकही पात्र महिला शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे नगरसेवक सय्यद वासिफ अली यांनी सांगितले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक, महिला सहभागी आणि संबंधित सर्वांचे नगरसेवक वासिफ सर यांनी आभार मानले.