शिस्तबद्ध मिरवणुकीत ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध कला व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पर्यावरणपूरक श्रीगणरायाची भक्तिमय वातावरणात उत्साहात स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे कला शिक्षक श्री. प्रेम सारस्वत यांनी स्वहस्ते साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. श्री. सुशीलदादा अत्रे यांच्या शुभहस्ते विधिवत करण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव श्री. अभिजीत देशपांडे, संचालक ॲड. श्री. पंकजदादा अत्रे, श्री. सचिन दुनाखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, सौ. लीना कुलकर्णी, सौ. अर्पणा मुळे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, श्री. अनिल सैंदाने, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, श्री. सुभाष पाटील, श्री. जगदीश साळुंखे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध मिरवणूक
संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. श्री. सुशीलदादा अत्रे यांच्या ‘अत्रेय आश्रम’ या निवासस्थानापासून श्रीगणरायांच्या सवाद्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. सजविलेल्या ट्रॅक्टरवर श्रीगणरायांची उत्सवमूर्ती विराजमान करण्यात आली होती. मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, सौ. प. न. लुंकड कन्या शाळेचे झांज व वाद्य पथक, शेठ ला. ना. सा. विद्यालयाचे मुलींचे झेंडा पथक, वाजंत्री, मुलींचे लेझीम पथक, एनसीसी पथक तसेच विद्यार्थ्यांचे पथक अशा शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी करण्यात आली होती.ढोल-ताशांच्या निनादात विविध पथकांनी तालबद्ध समूह नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. श्री. उल्हास ठाकरे, श्री. पंकज महाले, श्री. उमेश ढाकणे व सौ. अनिता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी शिस्तबद्ध प्रदर्शन केले. मिरवणुकीदरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.काही विद्यार्थ्यांसह शिक्षक श्री. योगेश सोनजे यांनी दोन्ही हातात काठ्या घेऊन वर्तुळाकार दिशेने काठी फिरविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. काही शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा आनंद घेतला. विद्यार्थिनींनी गणपती गीतावर आकर्षक समूह नृत्य सादर केले. शिवाजी चौक मार्गे ही मिरवणूक विद्यालयात पोहोचल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. संस्थेचे व विद्यालयाचे पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहात आणखी भर पडली.
महाआरतीनंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊ
विद्यालयाच्या परिसरात आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या गणेश मंडपात पर्यावरणपूरक श्रीगणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. श्री. सुशीलदादा अत्रे यांच्या हस्ते श्रीगणरायांची महाआरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ
श्रीगणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रंगीबेरंगी पताका बनविणे, कागदी हार व पुष्पगुच्छ तयार करणे, मोदक सजावट, एका मिनिटात जास्तीत जास्त श्रीगणेशांची नावे सांगणे, ‘माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ निबंध स्पर्धा, पेंट प्रोग्रामच्या माध्यमातून श्रीगणरायांची प्रतिमा साकारणे, श्रीगणेशोत्सवावर स्लाइड शो, सामूहिक अथर्वशीर्ष पठण तसेच ‘माझा बाप्पा, माझी आरास’ आदी उपक्रमांचा समावेश आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी केले. गणेशोत्सवातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.