Wednesday, September 16, 2026
police dakshta logo
Homeक्राईममध्यप्रदेशात धडक देत कासोदा पोलिसांनी उकलला २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा

मध्यप्रदेशात धडक देत कासोदा पोलिसांनी उकलला २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा

दोन आरोपी ताब्यात; चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त, अन्य आरोपी व मुद्देमालाचा शोध सुरू

कासोदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून तब्बल २३ शेळ्या-बोकड चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा कासोदा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन छडा लावला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून १८ लहान-मोठ्या शेळ्या व ५ लहान-मोठे बोकड, असे एकूण २३ शेळ्या-बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३४/२०२६, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.तांत्रिक तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात धडक दिली. तेथे अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, दोघांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.आरोपींकडे अधिक चौकशी केली असता गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या शोधासह चोरीस गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल, किरण गाडीलोहार आणि पोलीस कॉन्स्टेबल, योगेश पाटील यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या