दिनेश पाटील यांच्या कलाविष्काराला नागरिकांची दाद; आठ दिवसांच्या मेहनतीत साकारली आकर्षक प्रतिकृती
जळगाव | प्रतिनिधी :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील तरुण कलाकार दिनेश पाटील यांनी आपल्या कलाकौशल्यातून श्री सप्तशृंगी गडाचा देखणा व पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर करून सप्तशृंगी गडावरील मंदिर, गडाची रचना तसेच आजूबाजूचा परिसर यांची आकर्षक प्रतिकृती त्यांनी उभारली आहे.वृंदावन कॉलनी, गौरव पार्कसमोर, वाटिका आश्रमामागे, गट क्रमांक ३३९, प्लॉट क्रमांक ११, जळगाव येथील राहत्या घरी हा देखावा साकारण्यात आला आहे. गडाच्या भौगोलिक रचनेसह मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप बारकाईने अभ्यासून त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हा संपूर्ण कलाविष्कार पूर्ण करण्यासाठी दिनेश पाटील यांना तब्बल आठ दिवस अथक परिश्रम घ्यावे लागले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, सुबक मांडणी आणि गडाच्या रचनेतील बारकावे यामुळे हा देखावा नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.दिनेश पाटील यांच्या या कल्पक उपक्रमाचे परिसरातील नागरिक व भाविकांकडून कौतुक होत असून, हा कलात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.गणेशोत्सवात पर्यावरणपूरक संकल्पना प्रभावीपणे मांडणाऱ्या या उपक्रमातून कला, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.

