नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महावितरणच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नशिराबाद शहर कक्षाच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जेविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता सातवी ते दहावीतील सुमारे ५५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.नशिराबाद शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी वीज वापरताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली. विद्युत उपकरणांचा निष्काळजीपणे वापर टाळणे, तुटलेल्या किंवा धोकादायक विद्युत तारांपासून दूर राहणे आणि विद्युत खांब व इतर यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखणे याबाबत विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आल्या.यासोबतच दैनंदिन जीवनात अनावश्यक वीज वापर कमी करून ऊर्जा बचतीची सवय अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. सौरऊर्जेसह विविध हरित ऊर्जास्रोतांचा वाढता वापर, त्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनातील योगदान याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.विद्युत यंत्रणेत काही धोकादायक स्थिती आढळल्यास स्वतः त्यात हस्तक्षेप न करता तत्काळ संबंधित महावितरण कार्यालयाला कळवावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होते, यावर मार्गदर्शनातून भर देण्यात आला.कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका बनसोडे मॅडम, राजेंद्र पाचपांडे सर, अनिल चौधरी सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जेशी संबंधित विविध बाबी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंब आणि समाजातही विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.