Thursday, September 17, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद नगरपरिषदेत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू

नशिराबाद नगरपरिषदेत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे लालचंद पाटील यांच्या हस्ते अनावरण

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद नगरपरिषदेत गुरुवारी (दि. १७) ‘सेवा संकल्प अभियानास’ प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना शासकीय योजना, सेवा व लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ सुलभरीत्या मिळवून देणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे अनावरण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असलम सर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.कार्यक्रमास प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, नगरसेवक किर्तीकांत चौबे, मनोज पाटील, शैला व्यवहारे, जनाबाई रंधे, प्रदीप बोढरे, असलम सर, आशीफ शेख, सुवर्णा महाजन यांच्यासह विकास धनगर, कैलास व्यवहारे, विनोद रंधे, रईस भाई, सैय्यद फिरदोस तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकाभिमुख प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या आवश्यकतेवर मार्गदर्शन केले.

योजनांची माहिती व समस्यांच्या निराकरणावर भर

अभियानाच्या कालावधीत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांची माहिती देण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि योजनांसाठीची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

‘सेवा माझे योगदान’अंतर्गत सामाजिक उपक्रम

अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘सेवा माझे योगदान’ या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, जलसंधारण, रस्ता सुरक्षा, डिजिटल व सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती तसेच मतदार जनजागृती आदी विषयांवर स्थानिक गरजेनुसार उपक्रम घेण्यात येणार आहेत.प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच शहराच्या विकासाला चालना देणे, या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नशिराबाद शहरातील नागरिकांनी ‘सेवा संकल्प अभियानात’ सक्रिय सहभाग नोंदवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या