नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करून पाण्याची बचत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नशिराबाद नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, पाणीपुरवठा सभापती कीर्तिकांत चौबे तसेच मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी केले आहे.ऑक्टोबर २०२६ सुरू झाला असून पावसाळा नुकताच संपत असतानाच अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई ही केवळ एप्रिल-मे महिन्यांत भेडसावणारी समस्या नसून, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न केल्यास आगामी काळात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२६ तसेच त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट २०२७ या पुढील महिन्यांमध्ये पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा योग्य वापर करण्याची सवय नागरिकांनी लावून घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.नळ विनाकारण सुरू ठेवू नयेत, गरजेपुरतेच पाणी वापरावे, पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळावा तसेच उपलब्ध पाण्याचे जतन करावे. त्याचबरोबर इतर नागरिकांनाही पाणी बचतीसाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“पाणी आज वाचवले, तरच उद्याचे जीवन सुरक्षित राहील,” या संदेशातून नगरपरिषदेने नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत “पाणी वाचवा… भविष्यातील संकट टाळा!” असे आवाहन केले आहे.