Sunday, November 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये पुन्हा सोयाबीन चोरी! दोन दिवसांत दुसरी घटना; सहा कट्टे सोयाबीन अन्...

नशिराबादमध्ये पुन्हा सोयाबीन चोरी! दोन दिवसांत दुसरी घटना; सहा कट्टे सोयाबीन अन् उडदाचा कट्टा लंपास

घराच्या अंगणातून सोयाबीनचे सहा कट्टे आणि उडदाची चोरी; पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी व सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद शहरात शेतमाल चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा सोयाबीन चोरीची घटना समोर आली आहे. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शेतकरी कांतीलाल सावधेकर यांच्या राहत्या घराच्या अंगणात ठेवलेले सोयाबीनचे सहा कट्टे आणि उडदाचा एक कट्टा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांतीलाल सावदेकर यांनी आपल्या घराच्या अंगणात सोयाबीन व उडीद या शेतमालाचे कट्टे ठेवले होते. पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान त्यांना रिक्षाचा आवाज ऐकू आल्याने ते घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत रिक्षा निघून गेल्याने त्यांनी या आवाजाकडे विशेष लक्ष दिले नाही. सकाळी अंगणात जाऊन पाहणी केली असता सोयाबीनचे सहा कट्टे आणि उडदाचा एक कट्टा चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नशिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. तसेच चोरीचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच नशिराबादमध्ये जितेंद्र सिताराम पाटील यांच्या घराच्या आवारात ठेवलेल्या सोयाबीनच्या सहा गोण्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुन्हा त्याच स्वरूपाची चोरी झाल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. यंदा कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनात आधीच घट झाली असून, वर्षभर कष्ट करून पिकविलेला माल घराच्या आवारातून चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी निर्माण होत आहेत.

दरम्यान, याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मागील चोरीच्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. तसेच सद्याच्या चोरीच्या घटनेचाही तपास सुरू असून, लवकरच या घटनेतील आरोपींनाही ताब्यात घेण्यात येईल, असे सांगितले.सलग घडणाऱ्या शेतमाल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनांचा लवकरात लवकर छडा लावून शेतमाल चोरीच्या प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या