Friday, November 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादमध्ये ७७ वा संविधान सन्मान गौरव दिन उत्साहात साजरा

नशिराबादमध्ये ७७ वा संविधान सन्मान गौरव दिन उत्साहात साजरा

बुद्ध विहारात संविधान पूजन, प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन; शहीद जवानांना श्रद्धांजली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत मूल्यांची जपणूक करण्यासोबतच सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नशिराबाद येथे बौद्ध समाज पंचम मंडळाच्या वतीने ७७ वा संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध विहारात आयोजित या कार्यक्रमात संविधान पूजन, प्रतिमापूजन आणि संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी भारतीय संविधानाचे पूजन केले. त्यानंतर तुषार रंधे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना विनोद रंधे यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ही तत्त्वे केवळ संविधानापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना उपस्थितांनी मानवंदना अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.या कार्यक्रमाला शांताराम सोनवणे, प्रकाश सोनवणे गुरुजी, राजू वाघ, रतन सुरवाडे, वसंत, विपुल रंधे, प्रकाश रगडे, यश बिराडे, प्रकाश रंधे, बापू रंधे यांच्यासह बौद्ध समाजातील उपासक, उपासिका आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले, तर पंकजा रंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या